पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खाजगीकरणाला मनपाच्या माजी नगरसेवकांचा विरोध

 




निविदा मागे घेण्यासाठी 48 तासांचे अल्टिमेटम 


चंद्रपूर , अमृत कुचनकर विशेष प्रतिनिधी:  शहर महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार नेमण्याच्या हेतूने नुकतीच एक ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाचा मनपा प्रशासनाने घाट घातलेला असून सदर प्रस्तावित खाजगीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मनपातील 10 माजी नगरसेवकांनी मनपा प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम उपायुक्त अशोक गराटे यांना दि.19 रोजी दुपारी 12 वाजता एका लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे. दिनांक 21 जून पर्यंत प्रस्तावित खाजगीकरण मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या नगरसेवकांनी दिला.

     

   सविस्तर असे की इरई धरण,तुकुम जलशुद्धीकरण केंद्र, इरई नदी दाताळा हेडवर्क्स, रामनगर जलशुद्धीकरण,रामनगर जुने जलशुद्धीकरण केंद्र,बाबुपेठ सम्पवेल, बाबुपेठ जुने सम्पवेल या ठिकाणचे सर्व पंप,पॅनल,मोटार,व्हॉल्व इत्यादी पाणीपुरवठा योजनेतील सर्व यंत्रसामुग्री किंवा यंत्रसामुग्री-उपकरणे चालविण्यासाठी व देखभाल -दुरुस्तीसाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली. मात्र यापूर्वी पाणीपुरवठा योजनेतील ही सर्व कामे करण्यासाठी उज्वल कन्स्ट्रक्शन या एजन्सीला काम देण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेमध्ये उज्वल कन्स्ट्रक्शनच्या भोंगळ कारभारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

     तसेच मनपाला सुद्धा आर्थिक तोटा झाला.यानंतर मनपाच्या आमसभेत सर्वानुमते पाणीपुरवठ्याचे कंत्राट रद्द करून मनपातर्फे पाणीपुरवठा योजना चालविण्याचा ठराव घेण्यात आला. ही यंत्रणा चालविण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. मागील दोन वर्षांपासून मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा योजना चालविण्यात येत आहे.मात्र आता अचानक या संपूर्ण योजनेसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या हेतूने मनपा प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. यापूर्वी चंद्रपूर शहरातील सुमारे चार लक्ष नागरिकांच्या वतीने मनपाच्या आमसभेत तत्कालीन नगरसेवकांनी सर्वांनी मते खाजगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

   त्यामुळे मनपाची नवीन महासभा अस्तित्वात येईपर्यंत जुन्या आम सभेने घेतलेल्या निर्णयाचा मनपा प्रशासनाने आदर राखणे आवश्यक असल्यामुळे माजी नगरसेवक प्रस्तावित खाजगीकरणाचा विरोध करीत असल्याची माहिती माजी नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.या पत्रकार परिषदेला मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख,दिपक जयस्वाल, अशोक नागापुरे, पुष्पाताई मुन, मंगला आखरे, नीलम सचिन आक्केवार, स्नेहल रामटेके, बंटी परचाके, आकाश साखरकर ,राजू आखरे तसेच जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे ,मनीषा बोबडे ,इमदाद शेख,अक्षय येरगुडे ,प्रफुल बैरम,आकाश लोडे उपस्थित होते.

सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी खाजगीकरणाचा विरोध करण्याचे आवाहन

 विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्याच्या हेतूने पुन्हा एकदा आडमार्गाने खाजगीकरण करण्याचा मनपा प्रशासनाचा डाव आहे. मनपा प्रशासनाच्या या मनमानीचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे विरोध करावा असे आवाहन माजी नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्यातील विविध पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे सुद्धा आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post