कवठा - शेलु येथे कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

 




 महिंद्रा फायन्सस कंपनीचा कर्जापायी होता तगादा






 विदर्भ संपादक मिलिंद जामनिक,मूर्तिजापूर :- तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कवठा - शेलु येथील ५७ वर्षीय शेतकऱ्याने महिंद्रा फायन्सस कंपनीच्या असलेल्या कर्जबाजारीपणामुळे लावलेल्या तगाध्याने २८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कवठा - बपोरी रस्त्यावर ई क्लास जमिनीवरील निंबाच्या झाडाला दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली .

कवठा - शेलू येथील शेतकरी डीगांबर संपत पुनसे वय ५७ यांच्याकडे मालकीची ५ एकर कोरडवाहू शेती होती . मात्र अस्मानी व सुलतानी संकट तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे सततची नापिकी होत असल्याने उत्पन्नात नेहमी घट व्हायची . या कारणाने संसाराचा गाडा खेचण्यासाठी माना येथील युनियन बँकचे शेती लागवडीसाठी कर्ज अंगावर घेतले . मुलाबाळांचे लग्न करावयाचे असल्याने घर बांधनीसाठी अकोला स्थित महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज काढले होते . मात्र कर्जाची परतफेड होत नसल्याने महिंद्रा कंपनीचे कर्मचारी कर्ज भरण्यासाठी सारखा तगादा लावत होते . यासर्व बाबीला कंटाळून डीगांबर पुनसे यांनी २८ मे रोजी सकाळी साडे सात वाजता घरातून निघतांना सांगितले की , शेतात चक्कर मारून येतो . ते कवठा- शेलु ते बपोरी रस्त्यावर ई क्लास जमिनीवरील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आठ वाजताच्या दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसल्यावरून एकच कल्लोळ झाला . याप्रकरणी माना पोलिसांनी कळविण्यात आले . पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले . मृतक डीगांबर पुनसे यांच्या पाश्चात्य पत्नी , एक मुलगा , दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे . त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .




याप्रकरणी माना पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला असून तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक पंजाब इंगळे हे करीत आहे .

--------------------------------------

मृतक डीगांबर पुनसे यांनी महिंद्रा फायन्सस कंपनीचे घर बांधनीसाठी कर्ज घेतले होते . यापैकी त्यांनी कर्जाची परतफेड केली होती . मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्याने त्यांनी टोकाची निर्णय घेवून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले . त्यांच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली असून यामध्ये महिंद्रा कंपनीचे कर्मचारी वेळोवेळी प्रताडीत करणे वारंवार च्या तगादाने तसेच प्रकृती अवस्थामुळे आत्महत्या करीत असल्याचे यात लिहले आहे .

----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post