महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरलेल्या व्यक्तींची अनेक जीवन चरित्रे पहावयास मिळतात . साने गुरुजी याच कर्तुत्ववान व्यक्तीमधील एक सर्व श्रेष्ठ व्यक्ती आहेत . “ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” अशी शिकवण ज्यांनी जगाला दिली ते म्हणजे थोर समाजसेवक , स्वातंत्र्यसेनानी , विचारवंत पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी . साने गुरुजी यांच्या नावामध्येच निर्मळपणा , साधेपणा जाणवतो . श्यामची आई या पुस्तकामुळे सर्वत्र अजरामर झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी .
साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला . साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते . त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई साने असे होते . व वडिलांचे नाव सदाशिव साने होते . आई वडिलांकडून त्यांना उत्तम संस्काराचा झरा लाभला होता . याच अमृताच्या झर्यामधील अमृत प्राशन करून साने गुरुजींनी आपल्या जीवनाचा कल्पवृक्ष भक्कम केला . साने गुरुजींचा स्वभाव अतिशय भावना प्रधान व संस्कारक्षम होता . साने गुरुजी ज्या पद्धतीचे जीवन जगले त्याचे संपूर्ण श्रेय ते स्वतःच्या आईला देत असत . साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाले . त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मामाकडे पुण्यात पाठविण्यात आले . पण पुण्यात त्यांचे मन रमले नाही , परत ते दापोली येथील मिशनरी शाळेत राहण्यासाठी पालगडला आले .
साने गुरुजी दापोली येथे शिकत असताना मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवणारे हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली . त्यांना कवितेतही रस होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साने गुरुजींनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे प्रताप विद्यालयात ६ वर्षे शिक्षकाची नोकरी केली . तेथे ते विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील सांभाळत असत . साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि शिस्तप्रिय शिक्षणाचे धडे दिले . काही काळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक बनले . साने गुरुजी हे एक प्रतिभाशाली वक्ते होते . नागरी हक्क आणि न्याय यावर त्यांनी प्रभावी भाषण देऊन लोकांना आकर्षित केले . साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना अनेक अनमोल विचार दिले . साने गुरुजी यांचे काही अनमोल विचार पुढीलप्रमाणे सांगता येतील .
*साने गुरुजी यांचे अनमोल विचार *
१ . सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे .
२ . सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात .
३ . स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी .
४ . आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत .
५ . आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहे , वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही , मुख्य महत्त्व माणुसकीला आहे .
६ . आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे .
७ . एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात .
८ . कला म्हणजे परमोच्च ऐक्य आहे .
९ . कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन होय .
१० . कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा हि आजची भाकर आहे .
१२ . जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही .
१३ . ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे , वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे , ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान .
१४ . निर्बालांना रक्षण देणे हीच बळाची खरी सफलता होय .
साने गुरुजींनी १९२८ साली “विद्यार्थी” नावाचे मासिक सुरू केले. तसेच ते प्रताप तत्वज्ञान केंद्र , अमळनेर येथे तत्वज्ञान देखील शिकले . तत्वज्ञानाचा त्यांच्या लिखाणात विधायक परिणाम दिसून येतो . त्यांच्या जीवनावर महात्मा गांधीजींचा खूप मोठा प्रभाव होता . त्यांनी जीवनभर खादी वस्त्रांचाच वापर केला आहे . महात्मा गांधींनी 1930 मध्ये दांडीयात्रा सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी साने गुरुजींनी आपल्या शालेय नोकरीचा राजीनामा दिला . सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील त्यांच्या कार्यामुळे त्यांना 15 महिन्यांहून अधिक काळ धुळे तुरुंगात ब्रिटिशांनी कैद केले . नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखन पूर्ण केले , तर धुळे कारागृहात त्यांनी आचार्य विनोबा भावे यांनी कथन केलेल्या ‘गीताई’ या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले . त्यांचे पुढील आयुष्य साहित्यिक म्हणून व्यतीत झाले . “आई माझा गुरु – आई माझे कल्पतरू” आईचे असे वर्णन त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकात केले आहे . “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” , “बलसागर भारत होवो” या साने गुरुजींच्या प्रसिद्ध कविता आहेत . साने गुरुजींचे मन अत्यंत संवेदनशील होते .
1930 मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते . त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला . अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले . आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते ; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची . यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली . त्यांनी आंतरभारतीची स्थापना करून महान कार्य केले . साने गुरुजींनी जातीय पूर्वग्रह , दलितांना वागणूक आणि अस्पृश्यता यांसह विविध सामाजिक प्रथा यांना सातत्याने विरोध केला . हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून ते 1946 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरले . यासाठी त्यांनी 11 दिवसांचे उपोषण केल्यानंतर शेवटी विठ्ठल मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडण्यात आले . यानंतर “एका पांडुरंगाने दुस-या पांडुरंगाची सुटका केली” असा शब्दप्रयोग त्यावेळी वापरला जात होता .
स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी भारतीय समाजातील असमानता यामुळे निराश झाले . महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला . या शोकांतिकेबद्दल त्यांनी 21 दिवसांचे उपोषण केले होते . साने गुरुजी अनेक कारणांमुळे स्वातंत्र्यानंतर खूप अस्वस्थ झाले . या सर्व नैराश्यमय वातावरणात 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक वापर करून त्यांनी आपले जीवन संपवले .
आजच्या धावपळीच्या व हिंसेच्या जगात साने गुरुजींन सारख्या थोर शिक्षकाची नितांत गरज भासत आहे . खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे , कुणा ना व्यर्थ शिणवावे , कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्ता बंधू मानावे , जगाला प्रेम अर्पावे . अशी शिकवण देणारे तसेच केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हे तर शिक्षकाच्या भूमिकेतून राष्ट्र निर्माण करण्यात योगदान देणार्या साने गुरुजींना त्यांच्या जयंती निमित्त माझे विनम्र अभिवादन !!! विनम्र अभिवादन !!! .
शब्दांकन
श्री . नागन्नाथ घोरपडे
श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय .