सांगोला : सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात संपूर्ण उत्तर भारत यात्रा, श्रीक्षेत्र पंढरपूर ते घुमान (पंजाब) सायकल वारी केल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. सुरुवातीस प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे सर, प्रकाश खडतरे व महेश राजमाने यांनी संपूर्ण उत्तर भारत यात्रा सुमारे ३५०० किलोमीटर अंतर २८ दिवसात यशस्वीपणे पार केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सायकल यात्रेतील मनोगत व्यक्त करताना नीलकंठ शिंदे सर यांनी संपूर्ण सायकल यात्रेतील अनुभव सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील संस्कृती, अर्थव्यवस्था, शेती, समाजकारण, राजकारण याची माहिती आदान-प्रदान झाली. तेथील संवाद साधण्याचा लोकांशी जवळून संवाद साधण्याचा योग आल्याने नागरिकांशी जुळलेली नाळ कदापि विसरू शकत नाही जीवनात जसे अनेक चढउतार येतात या पद्धतीने आम्ही सर्वांनी सायकलिंग करून आमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. सुरत, अहमदाबाद, हिसार , जयपुर वाघा बॉर्डर ( भारत-पाक सीमा), अमृतसर, पठाणकोट, जम्मू काश्मीर येथील आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगून हा देश एकतेने व विविधतेने खऱ्या अर्थाने नटला असल्याचे सांगितले. संपूर्ण जीवनामध्ये निरोगी राहण्याकरिता दिवसातून किमान एक तास व्यायामाकरिता देणे प्रत्येकाने आवश्यक आहे, निरोगी जीवनाची गुरुकिल्ली सगळ्याकडे असेल तर आयुष्य सुखकर होते असे प्रतिपादन निळकंठ शिंदे यांनी व्यक्त केले. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगड येथील राजभवनात आम्हा सायकलस्वरांचा केलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचे आवर्जून सांगितले.
प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश पवार यांनी संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे व त्यांच्या सहकार्याने केलेली कामगिरीची नोंद इतिहासात आवर्जून घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सांगोला तालुक्याच्या मानाच्या दृष्टीने अनमोल, सोनेरी क्षण असल्याचे गौरवउद्गार पवार यांनी काढले. सूत्रसंचालन संतोष कुंभार यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.