रुख्मिणी महोत्सव २०२२ च्या पर्वावर सामाजिक, अध्यात्मिक संच विविध कार्यक्रमांची रेलचेल
शशांक चौधरी,तिवसा : 12 डिसेंबर रोजी अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांचा भव्य दिव्य जन्मोत्सव रुक्मिणी पीठ, अंबिकापूर-कौंडण्यपूर क्षेत्री आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांसह मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय संत समितीचे पदाधिकारी संपूर्ण भारतातून आले होते, इंदोर येथून महामंडलेश्वर राधे राधे बाबा, हिमाचल येथील महामंडलेश्वर रामायणी महाराज, भोपाळ येथील मंडलेश्वर हनुमानदासजी, मंडलेश्वर अनिलानंद महाराज, अमरावतीचे शिवधारा आश्रमातील संत डॉ. संतोष महाराज यांच्यासह शेकडो संतांची प्रमुख उपस्थिती हे जन्मोत्सव कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जगत जननी रुक्मिणीची रथ शोभायात्रा क्षेत्र कौंडण्यपूर येथे वाजतगाजत ,वारकऱ्यांचे दिंडी सह व 'रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरी' या जयघोषात व हरिनामाच्या गजरात संपन्न झाली. त्यानंतर बालकीर्तनकार ह.भ.प.कु.भूमिकादेवी यांनी कीर्तनसेवा सादर केली. जन्मोत्सव कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित महामंडलेश्वर राधे राधे बाबा, रामायणी महाराज, संत डॉ.संतोष महाराज यांच्या समवेत प्रमुख पाहुणे श्री.रुक्मिणी पीठाच्या विश्वस्त माजी पालकमंत्री तथा तिवसा विधानसभेच्या आमदार सौ.यशोमतीताई ठाकूर, आर्वीचे आमदार दादाराव केचे, अखिल भारतीय केसरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, परमपूज्य अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी समर्थ माऊली सरकार यांचे जन्मोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष व श्री रुक्मिणी पीठाचे विश्वस्त विलास इंगोले यांच्या समवेत आगमन होताच ‘सीताराम’ चा गजर सभागृहात घुमला. जगद्गुरू माउली सरकार व्यासपीठावर विराजमान झाल्यावर अमरकंटकच्या फलहारी पीठाचे अध्यक्ष राजेशजी मालवे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. पल्लवी यांच्यासह यशोमतीताई ठाकुर, विलास इंगोले, श्री दादारावजी केचे यांनी अभिषेक व पूजन केले. जगद्गुरु समर्थ माऊली सरकार यांना शुभेच्छा देताना श्री संत डाॅ.संतोषजी महाराज यांनी समाजाचा अध्यात्मिक व सामाजिक स्तर उंचावला असून होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करतानाच जगद्गुरू स्वामीजी भविष्यात एक नवी दिशा देऊन अखिल भारताला विश्वगुरू बनविण्याचे अलौकिक कार्य करतील हे निश्चित. आणि या कार्यातून तमाम भारतीयांना नवी प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय संत समितीच्या संरक्षक पदावरून संतांना सतत मार्गदर्शन करून समर्थ माऊली सरकारकडून सनातन हिंदू धर्माची संस्कृती आणि सभ्यता पुनरुज्जीवित केली जात आहे. महामंडलेश्वर रामायणी महाराज यांनी जगद्गुरू स्वामीजींना शुभेच्छा देताना भारतातील साधू समाजाची सर्व साधू-संतांची समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदार दादाराव केचे यांनी जगद्गुरू स्वामीजींच्या अपार आशीर्वादामुळेच आपल्या आयुष्यात समाजसेवेची संधी मिळाल्याचे सांगितले. जन्मोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष विलास इंगोले यांनी परमपूज्य जगद्गुरु स्वामीजींच्या बालवयातच दर्शन व अलौकिक ज्ञानार्जनाच्या प्रतिभेपासून ते जगद्गुरू पदापर्यंत पोहोचेपर्यंतचे कार्य मर्यादित शब्दात ठेऊन माऊली सरकारचे विलक्षण अलौकीक व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सहवासात राहून जीवनाचे सौभाग्य प्राप्त करा, असे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.