शासकीय मदतीसाठी सरपंच वाढई करणार पाठपुरावा.
चंद्रपूर
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर/राजुरा :-- राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून आगीच्या तांडवात विठ्ठल विरुटकर, कवडू पिंगे यांच्या गोठ्याला रात्री बारा वाजता अचानक आग लागली. या आगीत दोन्ही गोठे जळून खाक झाले. या गोठ्यांमध्ये शेतीचे अवजारे, जनावराचा चारा, रासायनिक खते इत्यादी वस्तू जळून भस्मसात झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे विठ्ठल विरुटकर यांच्या गोठ्यात त्यांच्या शेतात काम करणारा मनुष्य राहत होता. त्याचे अन्नधान्य, कपडे, मुलांचे शैक्षणिक पुस्तके अशा सगळ्या उपजीविकेच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या स्वतःला पायाला व चेहऱ्याला थोडी इजा झाल्याची माहिती आहे सुदैवाने त्याने तत्परतेने तेथून बाहेर पडल्याने बचावला. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई त्यांनी राजुरा येथील अग्निशामक दल व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी येथील अग्निशामक दलांना बोलावून दोन्ही गोट्याला लागलेली आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या आणि पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे व सर्व गावकर्यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने या दोन गोठ्याला लागलेली आग आटोक्यात आली. गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घरातील पाणी, मोटरपंप व अन्य मार्गांचा वापर करून आग विझविण्यासाठी मदत केली. यामुळे त्या आगीच्या तांडवाला गावातील अन्य वस्तीत पसरण्यापासून रोखण्यात आले. अन्यथा संपूर्ण गावात आग पसरून मोठी हानी होण्याची शक्यता होती. दरम्यान या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यांना तातडीने शासनाच्या सानुग्रह निधी अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले आहे.