६ तारखेपासून अधिकारी मुख्यालयी नसल्याचा नागरिकांचा आरोप; नागपूरवरून ये-जा सुरू असल्याची चर्चा, वीजेच्या लपंडावाने जनता हैराण!
गावाकडची बातमी,श्रीकांत राऊत
महागाव : महागाव तालुक्यातील गुंज येथील महावितरणचा कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत असून, वीजपुरवठ्याच्या सततच्या लपंडावामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित होणे, विविध तांत्रिक अडचणी आणि तक्रारींचे निराकरण होत नसल्याने गुंजकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेले संबंधित अधिकारीच मुख्यालयी उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
६ तारखेपासून अधिकारी मुख्यालयी कुठे?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी ६ तारखेपासून मुख्यालयी उपलब्ध नसून नागपूरवरून ये-जा करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे एखादी वीजसमस्या उद्भवल्यास नागरिकांनी नेमके कोणाकडे धाव घ्यायची? तक्रारींचे निराकरण कोण करणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या चकरा सुरू, पण समस्या जैसे थे!
महावितरण कार्यालयात नागरिक वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वीजबिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा आणि तक्रारींचे वेळेत निराकरण मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकारी झोपेत आहेत का?
गुंज येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न केवळ नागरिकांच्या तक्रारींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महावितरणच्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती, नागरिकांच्या तक्रारींची नोंद आणि प्रलंबित समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी.
अन्यथा नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार का? अधिकारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या शोधात फिरायचे? असा संतप्त सवाल गुंजकरांकडून उपस्थित केला जात आहे.
आता महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गुंजकरांच्या समस्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार का? की नागरिकांचा वीजप्रश्न असाच वाऱ्यावर सोडणार?
"गुंज येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वारंवार वीज बंद होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. समस्या घेऊन महावितरण कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी मुख्यालयी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ६ तारखेपासून अधिकारी मुख्यालयी नसल्याचा आमचा आरोप आहे. नागपूरवरून ये-जा होत असल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे करायच्या? वीजबिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे हा आमचा अधिकार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि गुंज येथील वीजसमस्या कायमस्वरूपी सोडवावी. अन्यथा आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी लागेल."
गजानन देशमुख लेवा
* नागरिक**

