नोटा पाहण्यासाठी व उचलण्यासाठी नागरिकांची गर्दी; नोटा खऱ्या की बनावट, याबाबत संभ्रम
किनवट : किनवट तालुक्यातील चिखली गावाजवळ, शिवबाबा आश्रमशाळेपासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पाचशे रुपयांच्या नोटा पडलेल्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या नोटा पाहण्यासाठी तसेच त्या उचलण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या कारमधून किनवटकडे जात असताना रस्त्यावर या नोटा फेकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. काही नागरिक नोटा उचलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
दरम्यान, रस्त्यावर आढळलेल्या या नोटा खऱ्या आहेत की बनावट, तसेच नेमक्या किती रकमेच्या नोटा फेकण्यात आल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगावी.
भररस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटा कोणी फेकल्या? त्यामागील नेमके कारण काय? हा प्रकार घडण्यामागे काही वेगळेच कारण आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.


