तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांना निवेदन; ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
किनवट : मौजे पिंपरी, धानोरा व बेल्लारी परिसरातील ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मागील जवळपास पाच वर्षांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे १३ हप्ते मिळत नसल्याच्या गंभीर प्रश्नावर शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून संबंधित शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासकीय व तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने उपस्थित केला.
यावेळी शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग, ई-केवायसी, बँक खाते, जमीन नोंदी तसेच पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तपासून प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा प्रश्न स्वतंत्रपणे सोडवावा, प्रलंबित हप्त्यांची कारणांसह माहिती द्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी संघटना आता सामूहिक लढा उभारणार असल्याची ठाम भूमिका मांडली. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय, किनवट येथे शेतकरी संघटनेच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.
या चर्चेवेळी मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, गुण नियंत्रण अधिकारी शिवाजी जाधव उपस्थित होते.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्यासह विठ्ठलराव दांडेगावकर, शोभाताई कुमरे, शिवराज मुंडे, माधव दहिफळे, बालाजी केंद्रे, संजय गुट्टे, ज्ञानेश्वर हूरदुखे, चंद्रकांत चोले, गजानन केंद्रे, दत्ता तोरकड, लक्ष्मण फड, राजाराम नागरगोजे, गोपाळ कांदे, आत्माराम गुट्टे, युवकनंदन सुर्वे, श्रीहरी हूरदुखे, काळबा डवरे, गोविंद भायमारे, युवराज हुरदुखे, जनार्दन कांदे, शकुंतलाबाई चव्हाण, लक्ष्मण हुरदुखे, विठ्ठल भायमारे, बालाजी केंद्रे, संदीप केंद्रे, साईनाथू केंद्रे, रामू भायमारे, दादाराव भायमारे, शांताबाई मेंडके, उत्तम गुट्टे, बालाजी आडे, वच्छला मिराशे, कविता मिराशे, कलावती बोरकर, अंजनाबाई टारपे, प्रेमाबाई मुकाडे, गंगाबाई बोरकर, गोदावरी हुरदुखे, रुक्मिनाबाई वानोळे, उत्तम हुरदुखे, शेख आशीफ शेख तुराब, माधव खोकले, दत्ता भडंगे, संतोष गुट्टे व नर्मदा मेंढे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आता संघटित लढा उभारला जात असून, प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



