वास्तुशांतीचा सोहळा ठरला २७ वर्षांनंतरच्या गुरू-शिष्यांच्या भावनिक पुनर्मिलनाचा साक्षीदार!
निमित्त गृहप्रवेशाचे; मात्र रंगला गुरू-शिष्यांच्या पवित्र नात्याचा अविस्मरणीय सोहळा
यवतमाळ : नव्या वास्तूची पूजा, मंत्रोच्चार आणि पाहुण्यांची लगबग... निमित्त होते वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळ्याचे; मात्र या सोहळ्यात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तब्बल २७ वर्षांपूर्वी शाळेच्या उंबरठ्यावर एकमेकांपासून दुरावलेले गुरू-शिष्य पुन्हा एकदा एकत्र आले आणि नव्या वास्तूत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील रहिवासी सौ. मुक्ता मेंडके (खोकले) यांच्या नवीन घराचा वास्तुशांती सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या आनंदाच्या क्षणी आपल्या शालेय जीवनाला दिशा देणाऱ्या आदरणीय शिक्षिका सौ. वंदना आमले (बोराडे) यांच्यासह जुन्या शालेय मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सोशल मीडिया आणि जुन्या मित्रांच्या मदतीने तब्बल २७ वर्षांपूर्वी शिकवणाऱ्या शिक्षिकांचा तसेच तत्कालीन वर्गमित्रांचा शोध घेत त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले.
सोहळ्याच्या दिवशी जेव्हा शिक्षिका आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावलेले त्यांचे माजी विद्यार्थी एकमेकांसमोर आले, तेव्हा वातावरण भावुक झाले. तब्बल २७ वर्षांनंतर आपल्या लाडक्या शिक्षिकेला वाकून नमस्कार करताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले, तर शिक्षिकेनेही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना मायेने जवळ घेतले. बालपणीच्या आठवणी, शाळेतील गमतीजमती आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना उपस्थित भारावून गेले.
यावेळी विजय कुमरे सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, घर हे विटा-मातीचे बनले असले, तरी आज माझ्या गुरूंनी आणि जुन्या सवंगड्यांनी या वास्तूत पाऊल ठेवल्यामुळे तिचे खऱ्या अर्थाने मंदिरात रूपांतर झाले आहे.
या प्रसंगी सुनील धुर्वे, अनिल सुरपाम आणि त्यांच्या इतर सवंगड्यांनी महामानव बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देऊन आदर व्यक्त केला. तसेच विजय कुमरे सर आणि त्यांच्या सहचारिणी यांनी शिक्षिकेचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
२७ वर्षांचा काळ, बदललेली परिस्थिती आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर मार्गक्रमण करणारे विद्यार्थी... मात्र गुरू-शिष्यांच्या नात्यातील जिव्हाळा आजही तितकाच कायम असल्याचे या पुनर्मिलनातून दिसून आले. त्यामुळे वास्तुशांतीचा हा सोहळा केवळ गृहप्रवेशापुरता मर्यादित न राहता गुरू-शिष्यांच्या पवित्र नात्याचा आणि जुन्या मैत्रीचा अविस्मरणीय उत्सव ठरला. या अनोख्या भावनिक पुनर्मिलनाची परिसरात सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे.

