बाजारपेठेतील वाढती गर्दी लक्षात घेता मूर्तिजापूर पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन ; घर बंद करून बाहेरगावी जातानाही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना
मूर्तिजापूर - दिवाळीचा सण म्हटला की बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह, नागरिकांची गर्दी आणि सर्वत्र लगबग असे चित्र पाहायला मिळते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठा, सराफा दुकाने, कपड्यांची दुकाने आणि गर्दीच्या ठिकाणी खरेदीसाठी जाताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांकडून मोबाईल, पाकीट, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तूंची चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी खरेदी करताना आपल्या साहित्यावर लक्ष ठेवावे. महिलांनी दागिने परिधान करून गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घ्यावी. पर्स, मोबाईल व पैशांची सुरक्षितता जपावी तसेच अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. अशावेळी बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवू नयेत. शक्य असल्यास त्या बँकेच्या लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. घरातील सुरक्षा व्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी. आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती अनोळखी व्यक्तींना अथवा समाजमाध्यमांवर देणे टाळावे. शेजाऱ्यांना आपल्या अनुपस्थितीची कल्पना देऊन घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी.सणासुदीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागांत पोलिसांची गस्त आणि देखरेख ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलीस प्रशासन सज्ज असले, तरी नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून सतर्क राहणे आवश्यक आहे.बाजारपेठेत किंवा परिसरात एखादी संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. चोरी किंवा अन्य अनुचित घटना घडल्यास आपत्कालीन मदतीसाठी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.दिवाळीचा आनंद साजरा करताना कोणाच्याही निष्काळजीपणामुळे चोरट्यांना संधी मिळू नये. नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची काळजी घेत सतर्कता बाळगावी. दिवाळीचा सण आनंदात, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी केले आहे.
