फार्मर आयडी तातडीने काढून घ्या; नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे शेतकऱ्यांना आवाहन


शासकीय योजना व अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक; सर्व सातबारा एकाच आयडीला जोडण्याचे आवाहन

माहूर


जिल्हा विशेष प्रतिनिधी | पंडित धुप्पे

नांदेड, माहूर : शासनाच्या विविध कृषी योजना आणि अनुदानांचा लाभ विनाअडथळा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) तातडीने काढून घ्यावे, असे आवाहन माहूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी केले. वानोळा येथील मंडळ अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या सातबारा उताऱ्याच्या आधारे फार्मर आयडी काढलेली नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी. फार्मर आयडीमुळे दुष्काळी अनुदान, पीकविमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यास सुलभता होणार आहे, असे जेठे यांनी स्पष्ट केले.


तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर एकापेक्षा अधिक सातबारा उतारे आहेत, त्यांनी सर्व सातबारा उताऱ्यांची नोंद एकाच फार्मर आयडीमध्ये करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी उर्वरित शेतकऱ्यांनी विलंब न करता फार्मर आयडी काढून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


कार्यक्रमाला वानोळा सज्जाचे मंडळ अधिकारी शंकर चंदनकर, तलाठी अभिजीत कुडमिते (वानोळा), तलाठी पेंटेवाड (कुपटी), तलाठी सुजाता गवले (दिगडी धा.), तलाठी ओमप्रकाश तवर (वझरा), वानोळा गावचे उपसरपंच अभिजीत राठोड, पत्रकार पंडित धुप्पे, राजेश आडे, वासुदेव राठोड, कोतवाल आढाव, विकास राऊत, बाबुलाल जाधव, भीमराव कुरसिंगे, दिगंबर जाधव, शांताबाई जाधव यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post