जिल्हा रुग्णालय नागपूर येथे तीन महत्त्वपूर्ण दिनांनिमित्त जनजागृती कार्यक्रम

 





गरीबी निर्मूलन, विधिक सहाय्यता आणि अपघातग्रस्तांच्या उपचारांबाबत नागरिकांना मार्गदर्शन

विभागीय संपादक निलेश रामगावकर 

नागपूर : जिल्हा रुग्णालय नागपूर येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक गरीबी निर्मूलन दिन, जागतिक आघात दिन आणि राष्ट्रीय विधिक सहाय्यता दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना तिन्ही दिवसांचे महत्त्व पटवून देत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन गुल्हाने आणि अधिसेविका वंदना विनोद बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


जागतिक गरीबी निर्मूलन दिनाच्या अनुषंगाने गरिबी निर्मूलनाचे महत्त्व, आर्थिक व सामाजिक समावेशन तसेच गरजू नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यावर भर देण्यात आला. राष्ट्रीय विधिक सहाय्यता दिनानिमित्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू व्यक्तींना मोफत कायदेशीर सहाय्य मिळण्याचा अधिकार, विधिक सेवा प्राधिकरणाची भूमिका आणि कायदेशीर मदतीसाठी उपलब्ध सुविधांबाबत माहिती देण्यात आली.


तसेच जागतिक आघात दिनानिमित्त रस्ते अपघातांसह विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्याचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि अपघात प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली.

हा कार्यक्रम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आयोजित करण्यात आला होता. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांपर्यंत माहिती पोहोचवून विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. नागरिकांमध्ये सामाजिक, कायदेशीर आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.




Post a Comment

Previous Post Next Post