वाढदिवसाचा जल्लोष नाही, तर गरजूंच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा संकल्प!

 

गाव सहेली




गंगाजीनगर येथे ३ नोव्हेंबरला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर



गंगाजीनगर : वाढदिवसाचा अनावश्यक जल्लोष करण्याऐवजी गरजू रुग्णांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याचा सामाजिक संकल्प गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राज्यश्री ताई हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने ३ नोव्हेंबर रोजी गंगाजीनगर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला सकाळी १० वाजता जिल्हा परिषद शाळेजवळ सुरुवात होणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विशेष म्हणजे, निवड झालेल्या रुग्णांसाठी शस्त्रक्रियेसोबतच आवश्यक रक्त तपासणी, राहण्याची व्यवस्था तसेच प्रवासाची सुविधाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या सामाजिक उपक्रमाचा लाभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव आणि गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन शिवसैनिक पिंटू आशीर्वाद पाटील वायफनीकर यांनी केले आहे.

आरोग्यसेवेचा हा उपक्रम केवळ एका गावापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील विविध तालुक्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस असून, समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे आणि त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण करणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणि दृष्टीचा प्रकाश आणणे, हीच खरी जनसेवा!

Post a Comment

Previous Post Next Post