श्यामजी निळकरी यांचे मार्गदर्शन; पत्रकार निलेश रामगावकर प्रमुख अतिथी
अमरावती/तळेगाव दशासर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळेगाव दशासर शाखेच्या वतीने बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता पोस्ट ऑफिसजवळील संघ मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला अमरावती महानगराचे संघ कार्यवाह श्यामजी निळकरी प्रमुख वक्ते म्हणून, तर पत्रकार तथा ‘गावाकडची बातमी’चे विभागीय संपादक निलेशभाऊ रामगावकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी ५ वाजता गावातून प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात येणार आहे. या पथसंचलनात स्वयंसेवक सहभागी होणार असून, शिस्तबद्ध संचलनातून संघभावना आणि एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्यामजी निळकरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक शिस्तीची भावना दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी पथसंचलनाच्या वेळेपूर्वी अर्धा तास गणवेशात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून विजयादशमी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळेगाव दशासर शाखेचे कार्यवाह श्रीराम ऑफ त.द. यांनी केले आहे.
