पेसा क्षेत्रातील भरतीसाठी आदिवासी विकास मंत्र्यांचे मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश
विशेष प्रतिनिधी – सुनील धुर्वे
मुंबई : राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शक, नियमानुसार आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
मंत्रालयात आयोजित विशेष आढावा बैठकीत राज्यातील पेसा क्षेत्रांमधील रिक्त पदांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी संबंधित पदांची भरती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.
तसेच, राज्याचे मुख्य सचिव यांना संबंधित १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा जिल्हानिहाय सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखून नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेसा क्षेत्रातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन आणि शासकीय सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता, ही विशेष मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रक्रियेमुळे आदिवासीबहुल भागांतील रिक्त पदे भरण्यास गती मिळण्याची अपेक्षा असून, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.
आता शासनाकडून जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील आणि भरती प्रक्रियेच्या पुढील वेळापत्रकाबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे संबंधित उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

