जय गुरुदेव भजन मंडळ, नागपूरच्या कलावंतांनी सादर केली भक्तिगीतांची सुरेल मेजवानी; रसिक मंत्रमुग्ध
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वंदना विनोद बरडे या सामाजिक कार्यकर्त्या यांच्या पुढाकाराने आणि सतीश होपळ यांच्या सौजन्याने भावपूर्ण भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जय गुरुदेव भजन मंडळ, नागपूर यांच्या कलावंतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली आणि गायलेली भजने सादर करून महाराजांना संगीतमय आदरांजली अर्पण केली.
या भजनसंध्येत तबलावादक संजय नागमोते, हार्मोनियमवादक उत्तमराव टेंबे, खंजिरीवादक सुधाकर अवधूत, तसेच टाळवादकांनी आपल्या वादनातून भजनांना सुरेल साथ दिली. यावेळी वंदना बरडे यांनी 'घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे', स्मयन होपळ याने 'हर देश में तू, हर भेष में तू', तर लता बोंबले यांनी 'या झोपडीत माझ्या' हे गीत सादर केले.
याशिवाय सतीश होपळ, उत्तम टेंबे, संजय नागमोते, निरंजन राऊत, सुधाकर अवधूत, अनिल बोंबले, मधुकर भाऊ, हर्षल पिंपळकर, स्मयन होपळ यांच्यासह इतर गायक व कलावंतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एकूण १०१ भजने सादर केली. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या भजनसंध्येने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि त्यांच्या भजनांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भक्तिरसाने ओथंबलेल्या या संगीतमय आदरांजलीने उपस्थितांच्या मनात राष्ट्रसंतांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.
