अरिहंत कॉन्व्हेन्टजवळ जीवघेणा खड्डा! प्रशासन आणखी किती दिवस झोपणार?
महिने उलटले तरी ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अमरावती/तळेगाव दशासर :
तळेगाव दशासर येथील अरिहंत कॉन्व्हेन्टजवळील नालीवरील रपटा तुटल्याने निर्माण झालेला मोठा खड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. मात्र, इतका मोठा खड्डा अनेक महिने कायम असतानाही त्याची दुरुस्ती करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी अरिहंत कॉन्व्हेन्ट असल्याने दररोज मोठ्या संख्येने लहान मुले व मुली या मार्गावरून ये-जा करतात. रस्त्यावरील हा धोकादायक खड्डा विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वार, पादचारी आणि इतर वाहनचालकांसाठीही अपघाताचा धोका निर्माण करणारा ठरत आहे.
“अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणची तातडीने पाहणी करून खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून समस्या कायम असूनही प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आला नाही का, की दुरुस्तीसाठी आणखी एखाद्या दुर्घटनेची प्रतीक्षा केली जात आहे, असा संतप्त सवालही नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
