विभागीय संपादक | निलेश रामगावकर
अमरावती/धामणगाव रेल्वे
शासनाच्या परिपत्रकानुसार समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी तसेच विद्यार्थी व युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी नशामुक्ती अभियान राबविणे ही काळाची गरज आहे. या अनुषंगाने सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानांतर्गत सामूहिक शपथ व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय, व्यसनाचे विविध प्रकार, व्यसन सोडण्यासाठी करावयाचे उपाय तसेच व्यसन लागूच नये यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. व्यसनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांचीही त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
‘नशामुक्त समाज आणि भारताचे भविष्य’ या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सुशिल नागपूरे यांनी विचार मांडले. निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त युवा पिढी ही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
नशामुक्ती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी न पडण्याचा संकल्प करावा, यासाठी अक्षय नवघरे यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक नशामुक्तीची शपथ दिली.
यावेळी विचारपीठावर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद हातेकर तसेच पर्यवेक्षक नरेश कावलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती भांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुराग बाभूळकर यांनी केले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘व्यसनमुक्त विद्यार्थी, व्यसनमुक्त समाज आणि सक्षम भारत’ या संकल्पनेला बळ दिले.

