ग्राहक जागृती, तक्रार निवारण आणि ग्राहकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याची नवी जबाबदारी
किनवट : सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्क, हित आणि संरक्षणासाठी सातत्याने आवाज उठविणारे झुंजार पत्रकार तथा मराठीबाणा न्यूजचे संपादक लक्ष्मीकांत मुंडे यांची किनवट तालुका ग्राहक पंचायत, किनवट या नोंदणीकृत स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद उद्धवराव सर्पे यांनी दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
किनवट तालुक्यात ग्राहकांच्या हक्क, हित व संरक्षणासाठी जनजागृती करणे, ग्राहकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणे, ग्राहकांच्या तक्रारी व समस्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे तसेच ग्राहक चळवळीला अधिक प्रभावीपणे व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने किनवट तालुका ग्राहक पंचायत कार्यरत आहे. संस्थेच्या कार्याचा तालुक्यात अधिक विस्तार व्हावा, ग्राहकांमध्ये जनजागृती वाढावी आणि संस्थेचे प्रशासकीय व संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे पुढे जावे, या उद्देशाने कार्यकारिणीच्या निर्णयानुसार लक्ष्मीकांत मुंडे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिव म्हणून मुंडे यांच्यावर तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्राहक जनजागृती कार्यक्रम राबविणे, ग्राहकांच्या समस्या व तक्रारींबाबत मार्गदर्शन करणे, संबंधित शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधणे, संस्थेच्या बैठका व उपक्रमांचे नियोजन करणे तसेच संस्थेने सोपविलेल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी राहणार आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा अनुभव असलेल्या लक्ष्मीकांत मुंडे यांच्या खांद्यावर आता ग्राहकांच्या हक्कांसाठी लढण्याची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. “पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनल्यानंतर आता ग्राहकांच्या हक्कांसाठी संस्थात्मक पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्राहकांची फसवणूक, अन्याय किंवा त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार,” असा निर्धार मुंडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे किनवट तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्राहक हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, लक्ष्मीकांत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक पंचायतच्या कार्याला नवी दिशा आणि व्यापक विस्तार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“ग्राहकांच्या हक्कासाठी लढणारा आवाज आता अधिक बुलंद होणार!” अशीच भावना या नियुक्तीमुळे व्यक्त होत आहे.

