देशरक्षण करणाऱ्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी जवानांची मने जिंकली
विभागीय संपादक निलेश रामगावकर
अमरावती/धामणगाव रेल्वे
केंद्रीय गोळा-बारूद डिपो (CAD), पुलगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साह, आपुलकी आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.केंद्रीय गोळा-बारूद डिपो CAD च्या मुख्य समुपदेशकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विशेष कार्यक्रमातून देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत देशसेवेत कार्यरत जवानांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. यावेळी विद्यार्थिनींनी जवानांना मिठाई देत त्यांच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुरक्षिततेची प्रार्थना केली. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करताना विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. राखी बांधताना ‘देशाचे रक्षण करणारे जवान हे संपूर्ण देशाचे भाऊ आहेत,’ या भावनेतून विद्यार्थिनींनी जवानांप्रती आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत विविध देशभक्तीपर गीतांचे भावपूर्ण सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सुरेल आणि उत्साहपूर्ण गीतांनी कार्यक्रमस्थळी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराचे जवानांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलचे शिक्षक शुभम जुनघरे, शुभम मिश्रा, चारूलता दारोकर, शुभांगी इंगळे, स्नेहल कोटनाके आणि हर्षल नरोडे उपस्थित होते. तसेच मिल्ट्री कॅम्पचे अनिल गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या रक्षाबंधन कार्यक्रमात लोकमत सखी मंच, श्री साई शीला सखी मंच, योग वेदांत सेवा समिती, ऑल इंडिया ॲक्टिव्ह वुमन्स ग्रुप, सखी उत्साही मंच (वर्धा) यांच्यासह विविध सामाजिक व महिला संस्थांच्या प्रतिनिधींनीही सहभाग नोंदविला. देशाच्या सीमा आणि राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलचा या उपक्रमातील सहभाग विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, त्यागाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविणारा ठरला.


