झरी-जामणी क्रीडा संकुलावरून वाद; रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे लक्ष निर्णयाकडे

 

Zarijamni


Gavakadachibatmi


झरी-जामणी : झरी-जामणी नगरपंचायतीसाठी मंजूर झालेल्या क्रीडा संकुलाच्या उभारणीवरून तालुक्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. तालुक्याचे क्रीडा संकुल हे तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या झरी-जामणी नगरपंचायत क्षेत्रातच उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

या मागणीसाठी यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणही केले होते. उपोषणादरम्यान माननीय आमदारांनी लेखी आश्वासन देत क्रीडा संकुल झरी-जामणी येथेच उभारण्यात येईल तसेच त्यासाठी सातबारा तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.

मात्र, सध्याच्या घडीला क्रीडा संकुल पाटण येथे नेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी व झरी-जामणीतील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, क्रीडा संकुल झरी-जामणी येथेच व्हावे या मागणीसाठी उद्या रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पाटण हे पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र असून, त्या ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र क्रीडा संकुलाची मागणी करण्यात यावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. तालुक्याच्या मुख्यालयासाठी मंजूर झालेल्या क्रीडा संकुलाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्या प्रयत्नांमुळे क्रीडा संकुल पाटण येथे नेण्याचा प्रयत्न होत असल्याची राजकीय चर्चा तालुक्यात रंगली आहे. मात्र, या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत भूमिका किंवा पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.

उद्या होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी कोणता निर्णय घेतात, तसेच क्रीडा संकुल पाटण येथे उभारले जाणार की तालुक्याचे मुख्यालय असलेल्या झरी-जामणी नगरपंचायत क्षेत्रातच उभारले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post