जनावरांच्या उपचारासाठी २५० रुपये फी, औषधे उपलब्ध नसल्याची तक्रार; शासकीय औषधांच्या वितरणावरही प्रश्नचिन्ह
घोटी : घोटी भागातील पशुपालक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जनावरे आजारी पडल्यास डॉक्टरांना फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची, तर उपचारासाठी संपर्क झाल्यास एका बकरीसाठी २५० रुपये फी व इंजेक्शनचे शुल्क वेगळे आकारले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जंतनाशक गोळ्यांव्यतिरिक्त इतर औषधे व इंजेक्शन शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशाने खरेदी करावी लागत असल्याचा आरोप आहे.
कॅल्शियम, लिव्हर टॉनिक, चाटण विटा, मल्टीव्हिटामिन तसेच मिनरल मिक्स्चर पावडर किंवा लिक्विड यांसारखी औषधे उपलब्ध असल्याचे सांगितले जात असतानाही ती शेतकऱ्यांना दिली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मिनरल मिक्स्चर मागितल्यास एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्याकडे पाठविले जाते, अशीही तक्रार आहे.
शासकीय औषधांचा साठा नेमका किती आहे? त्याचे वितरण कोणाला केले जाते? औषधे उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना का दिली जात नाहीत? याची चौकशी करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.
पशुधनावर अवलंबून असलेल्या गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना खासगी उपचाराचा अतिरिक्त खर्च परवडत नसल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन शासकीय पशुवैद्यकीय सेवा सुरळीत करावी, उपलब्ध औषधांचा पारदर्शक साठा व वितरण तपासावे आणि शेतकऱ्यांना आवश्यक उपचार व औषधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.
