घाटंजी : शहरातील म्हल्ले ले-आऊट, पांडुरणा रोड परिसरातील एका विहिरीत पडलेल्या दोन वराहांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. विहिरीत दोन वराह पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभाग व नगरपरिषद प्रशासनाला याबाबत माहिती दिली.
मात्र, माहिती देऊन दोन दिवस उलटूनही ठोस बचावकार्य सुरू झाले नसल्याने दोन्ही वराहांची विहिरीत जीवघेणी झुंज सुरू होती. दरम्यान, संतोष अडकळकर यांनी ही घटना समाजमाध्यमांवर मांडल्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
त्यानंतर पांढरकवडा येथील वन्यप्राणी बचाव पथकातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत उतरून अथक प्रयत्न केले. अखेर दोन्ही वराहांना सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक एस. वर्मा, वनरक्षक परमेश्वर अनकाडे, अक्षय चाणेकर तसेच वन्यप्राणी बचाव पथकातील वनरक्षक उमेश गहूकार, सुभाष पिकलीकरवार, विजय मेघ्राम, पंकज बेलाटे, मंगेश झाडे, धवल तुडमवार आदींनी बचावकार्य पार पाडले.
या बचावकार्यात स्थानिक नागरिक गणेश येवले, अंकुश आव्राम, कुंदन पाटील, नंदकिशोर नखाते, राहुल गायकवाड, निखिल दिवकुंडवार व गौरव एळगुंडेवार यांनीही सहकार्य केले.
