यात्रा-जत्रांमधून टुरिंग टॉकीज नामशेष; ग्रामीण मनोरंजनाची हरवलेली ओळख

 


तळेगाव दशासर / प्रतिनिधी – निलेश रामगावकर

मो. 8806581053

ग्रामीण भागातील मनोरंजनाचे एकेकाळचे हक्काचे साधन असलेल्या टुरिंग टॉकीज अर्थात फिरत्या चित्रपटगृहांचा व्यवसाय आता पूर्णतः डबघाईस आला असून यात्रा-जत्रांमधून ही संस्कृती नामशेष होत चालली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी टुरिंग टॉकीजकडे पाठ फिरवली आहे.

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये टुरिंग टॉकीज हे प्रमुख आकर्षण मानले जात होते. तळेगाव दशासर येथील शंकरपट यात्रेत दरवर्षी चार ते पाच टुरिंग टॉकीज दाखल होत असत. गावातील तरुणांसह वृद्धांनाही या टॉकीजची मोठी उत्सुकता असायची. काही टॉकीज तर तीन ते चार महिने ठिय्या मांडून राहत असत.



त्या काळात मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहणे हे ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठे अप्रूप होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र बसून चित्रपटांचा आनंद घेत असत. “चला चला… पळा पळा… सुरू होत आहे…” असा आवाज यात्रेच्या परिसरात सतत घुमत असे. मात्र आता हा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

सध्या मनोरंजनासाठी शेकडो दूरचित्रवाहिन्या, मल्टिप्लेक्स, मोबाईल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने टुरिंग टॉकीजची क्रेझ कमी झाली आहे. नवीन चित्रपट काही दिवसांतच मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहण्याचे प्रमाणही घटले आहे.

स्मार्टफोन येण्यापूर्वी यात्रा-जत्रांमध्ये लोक मोठ्या उत्साहाने मौजमजा करत असत. मात्र बदलत्या काळानुसार ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेली टुरिंग टॉकीज आता इतिहासजमा होत असल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post