नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा भव्य शिवसंवाद दौरा

 



नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचा भव्य “शिवसंवाद दौरा”; 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विधान सभा निहाय 28.मे.गुरुवार रोजी.आढावा बैठक


विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

नांदेड : शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या “शिवसंवाद दौऱ्या” अंतर्गत नांदेड विधानसभा निहाय महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना संसदीय गट नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक दि. २८ मे २०२६ रोजी गुरुवार, सकाळी १० वाजता हदगाव येथे पार पडणार आहे. या बैठकीमुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.


राज्यातील विविध भागांमध्ये “शिवसंवाद दौरा” राबवून पक्ष संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेनेचे वरिष्ठ नेते थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न, संघटनात्मक अडचणी, आगामी निवडणुकीची रणनीती तसेच जनसंपर्क वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. हदगाव येथे होणारी बैठक ही नांदेड विधानसभा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात येणार आहे.


बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या तसेच शिवसैनिकांशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विविध विषयांवर संवाद, नियोजन आणि संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन होणार आहे. शिवसेनेच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहावे, गावपातळीवर पक्षाची ताकद वाढवावी आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा, असा संदेश या बैठकीतून दिला जाणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.


दरम्यान, नांदेडचे सह संपर्क प्रमुख रवि राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि पक्षप्रेमींना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “ही बैठक केवळ आढावा बैठक नसून, शिवसैनिकांना नवी ऊर्जा आणि दिशा देणारा संवाद मेळावा ठरणार आहे. पक्षप्रमुखांच्या विचारांना बळ देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने उपस्थित राहणे आवश्यक आहे,” असे रवि राठोड यांनी म्हटले आहे.


हदगाव शहरात या बैठकीनिमित्त बॅनर, पोस्टर आणि स्वागत फलक लावण्यात येत असून, शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ग्रामीण भागातूनही कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याने प्रशासन आणि आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी हा “शिवसंवाद दौरा” महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. 

किनवट - माहूर विधान सभेतील माहूर तालुका अध्यक्ष. सुदर्शन नाईक, किनवट तालुका अध्यक्ष. बालाजी मुरकुटे . जिल्हा सचिव. मनोज त्रिमांवर, विशाल जाधव, सागर रुणवाल. यांनी देखील शिव सैनिकांना ब्येठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post