प्रा.दामोदर मोरे हे राष्ट्रीय मान्यता मिळालेले कवी - डॉ.श्रीपाल सबनीस

 

Village news network

कल्याण प्रतिनिधी/ आशा रणखांबे

  कल्याण ज्यांच्या विद्वत्तेची ख्याती महाराष्ट्राबाहेर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली ते प्रा.दामोदर मोरे आज वसंत मून पुरस्कार मिळालेल्या डॉ गंगाधर पानतावणे, डॉ यशवंत मनोहर,वामन होवाळ आणि कुमुद पावडे यांच्या परंपरेत जाऊन बसले आहेत.त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.महाराष्ट्राच्या भौगोलिक चौकटी ओलांडून प्रा.मोरे यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत.देशातील शंभर विद्वानांनी त्यांच्या कवितेवर लेख लिहिले आहेत.त्यांची कविता पूर्णपणे आंबेडकरवादी आहे.त्यांच्या कवितेचा गौरव म्हणजे आंबेडकरवादाचा गौरव आहे.तो मानवतेचा, समतेचा गौरव आहे.दामोदर मोरे हे राष्ट्रीय मान्यता मिळालेले कवी आहेत.म्हणूनच या प्रतिष्ठानला त्यांचा सन्मान करतांना अभिमान वाटत आहे." असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.उल्हासनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वसंत मून सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.


                  श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य फक्त दलित समाजापुरते मर्यादित नव्हते. ते व्यापक होते.ज्ञान ही विश्वात्मक कल्पना आहे व ज्ञानाच्या व्यापक संदर्भात वसंत मून यांच्या कार्याचा परिप्रेषक वाढत विश्वापर्यंत जातो.सत्कारमूर्ती प्रा.दामोदर मोरे यांनी आपल्या भाषणात वसंत मून यांच्या कार्याचा गौरव केला.आणि त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या.

यावेळी पद्मश्री कल्पना सरोज,डॉ.प्रकाश वाकोडे, महेश भारतीय, किरण सोनवणे यांचीही समयोचित भाषणे झाली.

             याप्रसंगी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुण्या उद्योजक पद्मश्री कल्पना सरोज, फौंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका अंजली साळवे, डॉ.चंद्रकांत साळवे यांच्या हस्ते दामोदर मोरे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा पाचवा वसंत मून पुरस्कार देण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एकवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या वेळी दामोदर मोरे यांना देण्यात आलेल्या सन्मान पत्राचे वाचन प्रा.सिंधू रामटेके

यांनी केले. डॉ जलदा ढोके - गाणार यांच्या ' वसंत मून ( मराठी साहित्य आणि विचार विश्व ) या ग्रंथाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल केदारे यांनी केले. 

                   या पुरस्कार सोहळ्याचे अत्यंत देखणे संयोजन फौंडेशनचे संचालक रोहित साळवे यांनी केले.या कार्यक्रमास मिलिंद मून, आय एम मोरे, जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे , साहित्यिक शिवा इंगोले, शुक्राचार्य गायकवाड, आशालता कांबळे,दिलीप मालवणकर, डॉ मंगेश बनसोड, प्रशांत धांडे, संजय अभंग, अनुराधा वानखडे हे मान्यवर आणि प्रचंड जन समुदाय उपस्थित होता.उज्वला मिलिंद मून यांच्या आभार प्रदर्शनाने या शानदार कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post