सागर पंडित यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

 


अकोला जिल्ह्याचा मान वाढवणारा सन्मान; सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल



Editor Milind jamnik 

मूर्तिजापूर  : अकोला जिल्ह्यातील कवळा जहाँ येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सागर प्रदीप पंडित यांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, या निवडीमुळे मूर्तिजापूर तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था ही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी नामांकित संस्था असून, दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सागर पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सागर पंडित यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांत स्वतःला झोकून दिले आहे. ग्रामीण भागातील समस्या सोडवणे, युवकांना संघटित करून समाजोपयोगी कार्य राबवणे आणि जनजागृती करणे यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेची आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कार निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आणि सचिव मिलिंद कळवणकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे. या निवडीबद्दल सागर पंडित यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच एका विशेष सोहळ्यात त्यांना सहकुटुंब व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करताना सागर पंडित म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा सन्मान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळणारा हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा देईल.”

Post a Comment

Previous Post Next Post