परतवाड्यात अल्पवयीन मुलींशी लैंगिक व सायबर शोषणाचा प्रकार; महिला काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी
अचलपूर / परतवाडा परिसरात अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिक व सायबर शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अचलपूर तालुका महिला काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयान अहमद (वय अंदाजे १९ वर्षे) या युवकाने अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवून त्यांची फसवणूक केली. त्यानंतर संबंधित मुलींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पीडित मुलींच्या मानसिक आरोग्यावर तसेच त्यांच्या कुटुंबांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम झाल्याची बाब पुढे आली आहे.
सदर प्रकरण हे पॉकसो कायदा, आयटी कायदा व भारतीय दंड संहितेअंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाचे असल्याने याकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे महिला काँग्रेसने नमूद केले आहे.
महिला काँग्रेसच्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, पीडित मुलींची गोपनीयतेने व बालसुलभ पद्धतीने चौकशी करावी, त्यांना मानसिक समुपदेशन व आवश्यक संरक्षण द्यावे, तसेच सोशल मीडियावर प्रसारित झालेले आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तात्काळ हटविण्याची कार्यवाही करावी.
यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून प्रशासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कांचनमालाताई गावंडे, तालुकाध्यक्ष अश्विनी देवेंद्र पेटकर, माजी जि. प. सदस्य वासंतीताई मांगरोळे,कविता बोरेकार,योगिता चांदुरकर,निलिमा दामोधरे,मंगेश सांगोळे,श्रीकांत झोडपे,सचिदानंद बेलसरे,विशाल खानाझोडे, राहुल गाठे, विशाल वाठ,जिल्हा कमिटी सदस्य सौ. अश्विनी जितेंद्र मसने व तालुका उपाध्यक्षा पल्लवी वाटाणे, तालुका ग्रामीण अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, देवेंद्र पेटकर, ऐजाजखान ओम घोरे, जय घोरे,अंकुश ठाकरे यावेळी उपस्थिती होते.



