मंगरूळ कांबे येथे बुद्धधम्म श्रामणेर प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न....!

 



देश-विदेशातील भिक्खू संघांचा सहभाग ; धम्म, विनय व शीलमय जीवनाचा संदेश


Editor- Milind jamnik

मूर्तिजापूर - तालुक्यातील मंगरूळ कांबे येथील धम्मधातु बुद्ध विहार व धम्मकुटी येथे धम्म स्पायर चॅरिटेबल ट्रस्ट (गंगाखेड कोंडे) यांच्या वतीने आयोजित बुद्धधम्म श्रामणेर प्रशिक्षण शिबिर धार्मिक व प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडले. या शिबिरात देश-विदेशातील भिक्खू संघांनी सहभाग घेत श्रामणेरांना धम्म, विनय, ध्यान आणि आचारसंहितेचे सखोल मार्गदर्शन केले.या प्रसंगी श्रीलंकेचे पूज्य भदंत विनयपाल महाथेरो, भदंत एस. नागसेन थेरो, भदंत ज्ञानज्योती महाथेरो (ताडोबा, चंद्रपूर) यांच्यासह भिक्खू शीलानंद, धम्मदीप, सुमंगल, आनंद, राहुल, विनय, चंद्रदीप आदींची प्रमुख उपस्थिती होती. भिक्खू संघांनी आपल्या प्रवचनातून “बुद्धांचे विचार आचरणात आणणे आणि शीलसंपन्न जीवन जगणे हेच खऱ्या प्रगतीचे सूत्र आहे,” असे प्रतिपादन केले.

दरम्यान, नागपूर येथील दानशूर धम्मदाते व ‘आधुनिक अनाथपिंडक’ म्हणून ओळखले जाणारे शरद चौरपगार यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत धम्मदानाचा संकल्प जाहीर केला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमादरम्यान समता सैनिक दलाने शिस्तबद्ध सहभाग नोंदवत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मानवंदना दिली. पंचशील ध्वजारोहण, धम्मशांती रॅली, सामूहिक भोजनदान तसेच भिक्खू संघ सेवा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला स्थानिक ग्रामस्थ, उपासक-उपासिका तसेच युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अकोला जिल्ह्यासह दर्यापूर तालुक्यातील विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या श्रामणेरांनी पुढील काळात धम्मप्रचार करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.या यशस्वी आयोजनामुळे मंगरूळ कांबे हे ठिकाण धम्म, शांती आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

Previous Post Next Post