महिला सक्षमीकरणासाठी कायद्याचे ज्ञान अत्यावश्यक – प्रफुलभाई कुकडे

 




बडनेरा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यशाळा


अमरावती,बडनेरा : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणासोबतच कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून अंधश्रद्धा, अन्याय व सामाजिक भेदभावाविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावतीचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुलभाई कुकडे जिल्हा कार्याध्यक्ष महा अनिस अमरावती यांनी केले.

अनुभव शिक्षा केंद्र अमरावती व समाजकार्य महाविद्यालय बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “आजची महिला आणि कायदा” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन बडनेरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुषमा मांडवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी महिलांना कायद्याची माहिती असणे आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजामध्ये महिलांनी आपल्या हक्कांविषयी सजग राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अनुभव शिक्षा केंद्र अमरावतीच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा “ लेक लाडकी पुरस्कार – २०२६”‌ विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आला. अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रियेमध्ये सन २०२३ पासून सक्रिय सहभाग घेत नेतृत्व गुण विकसित करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील युवती गौरी राजकुमार घुरडे व नंदनी ब्रह्मानंद कोतवाल यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते लेक लाडकी पुरस्कार – २०२६* देऊन गौरविण्यात आले.


तसेच समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रियेमधून घडलेले व्यक्तिमत्व डॉ. शिवाजी तुप्पेकर यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सुखदेवे आणि पोलीस वैशाली चौधरी व अनुभव साथी रोशन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी तुप्पेकर तसेच अनुभव शिक्षा केंद्र अमरावती-वाशिमचे जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Post a Comment

Previous Post Next Post