जवळापूर येथे मजूर दाम्पत्यावर घरात घुसून बेदम मारहाण; एसपींच्या आदेशानंतर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल


मारहाण




सुरुवातीला केवळ एनसी नोंद केल्याचा आरोप; चौघांविरुद्ध पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा..!
संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही चौकशी

 



      विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

अमरावती : अचलपूर तालुक्यातील जवळापूर (पो.स्टे. पथ्रोट) येथे एका गरीब मजूर दाम्पत्यावर घरात घुसून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणात सुरुवातीला पोलिसांकडून केवळ एनसी (नॉन-कॉग्निजेबल) नोंद करण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता. मात्र पीडित कुटुंबाने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर या प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून अखेर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास काही व्यक्तींनी लाठ्या-काठ्या घेऊन बाळकृष्ण रामकृष्ण लव्हाळे (वय ५०) यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्यावर, छातीवर, खांद्यावर, पायावर तसेच ओठ व तोंडावर गंभीर दुखापती झाल्या. मारहाणीच्या वेळी त्यांच्या अंगावरील कपडे रक्ताने माखल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सौ. करुणा बाळकृष्ण लव्हाळे (वय ४५) या अनुसूचित जातीतील महिलेलाही निर्दयपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या मांडीसह शरीराच्या विविध भागांवर लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. दलित महिलेच्या घरात घुसून झालेल्या या मारहाणीचा प्रकार अत्यंत गंभीर असतानाही सुरुवातीला पोलिसांकडून गुन्हा दाखल न झाल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत होती.

घटनेनंतर पीडित महिला करुणा लव्हाळे या स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार स्टेशन डायरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सांगण्यानुसार तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट थातूरमातूर स्वरूपाची एनसी नोंद करून त्यांना परत पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे महिलेला व तिच्या पतीला झालेल्या गंभीर मारहाणीचा उल्लेखही त्या नोंदीत करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने ७ मार्च रोजी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एसपींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानंतर उप पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केली.

यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत आरोपींविरुद्ध पथ्रोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात सुरेंद्र वांदे (वय ५०), कुलदीप वांदे (वय २२), रवी वांदे (वय ६०) आणि उज्वला वांदे (वय ४५), सर्व रा. जवळापूर यांच्याविरुद्ध एफआयआर क्रमांक 0061/2026 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 333, 292, 324(4), 352 तसेच 351(2) व 351(3) या कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(2)(va), 3(1)(r) आणि 3(1)(s) लागू करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

■ संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर चौकशी ■

या प्रकरणात सुरुवातीला केवळ एनसी नोंद करून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आल्याने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही चौकशी नेमण्यात आली आहे.

एएसआय प्यारेलाल जंजाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर तायडे यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्या कामकाजाची सखोल तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, महिला दिनीच दलित महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जवळापूर परिसरात कोणतेही तणावाचे वातावरण नसून परिस्थिती शांत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Tags : #जवळापूर, #मजूरदाम्पत्य, #गुन्हा, #मारहाण, #एसपीआदेश, #अट्रॉसिटी, #स्थानिकसमाज, #निर्णय, #कायदा, #संरक्षण, #मजुरांचेअधिकार, #समाजसेवा, #न्याय, #तक्रार, #अत्याचार, #police

Post a Comment

Previous Post Next Post