ऍक्शन फोर्स टीचर्स असोसिएशनच्या मागण्यांवर प्रशासनाची लवकर तोडगा काढण्याची ग्वाही
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मुर्तिजापूर - पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ऍक्शन फोर्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासनासोबत सकारात्मक व विधायक चर्चा पार पडली. गटसाधन केंद्र, मुर्तिजापूर येथे आयोजित या बैठकीस गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके यांनी वेळ देत शिक्षकांच्या प्रश्नांची सविस्तर दखल घेतली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेदरम्यान निवडश्रेणी प्रस्ताव, चटोपाध्याय प्रस्ताव, आयकर कपात, सेवापुस्तक नोंदी अद्ययावत करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले, शिक्षक समायोजन, गटसमन्वयक प्रभार, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व इतर मालाच्या गुणवत्तेचा प्रश्न तसेच प्रलंबित स्थानिक सुट्ट्यांचा मुद्दा आदी विषय मांडले.प्रत्येक मुद्द्यावर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून संबंधित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
या चर्चेला गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके , शिक्षण विस्तार अधिकारी संजय मोरे , सर्व बीट लिपीक तसेच ऍक्शन फोर्स टीचर्स असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत परस्पर सहकार्याच्या भावनेतून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
