सोनखास प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा - आझाद समाज पार्टी (कां) च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशिम : सोनखास येथे दिनांक ४ मे रोजी लग्नाच्या वरातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा गीत वाजविल्याचा विरोध केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन, वाशिम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्याप गुन्हेगारांना अटक करण्यात आली नसल्याने सोनखास प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या मार्फत आज दिनांक १७ मे रोजी आझाद समाज पार्टी(कां) वाशिम च्या वतीने देण्यात आले.
तेथील बौद्ध समुदायावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्यामुळे त्यांचे जीवन जगणे असह्य झाल्याचेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांनी कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलून सामाजिक सलोखा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास या अन्यायाविरुद्ध आजाद समाज पार्टी (कां) योग्य ते पाऊल उचलेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी रूपेश भगत जिल्हा प्रभारी वाशिम सुभाष अंभोरे जिल्हा अध्यक्ष संजय पडघान, गोवर्धन राऊत, मुकींदा खरात, सुरेश सोनोने, किशोर खडसे, संजय खडसे उपस्थित होते.