जलजीवनच्या कामाची समिती गठीत करुन चौकशी करा
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
पाणी टंचाई आढावा बैठक
वर्धा, मंगला भोगे : प्रत्येक गावातील कुंटूबांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी देशपातळीवर जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. परंतु या योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सेलू तालुक्यातील ब-यांचशा गावातील कामे अपूर्णाअवस्थेत आहेत त्याचबरोबर काही कामामध्ये त्रुट्या आढळून आल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सेलू तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची तालुका स्तरीय समिती गठीत करुन पाहणी करावी व अहवाल सादर करावा अशा सुचना गृह (ग्रामिण), गृह, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सेलू तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठकीत केल्या.
आज पंचायत समिती सेलूच्या सभागृहात सेलू तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकीला उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार मलीक विराणी, गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मुडे, सरपंच संघटेच्या अध्यक्षा श्रीमती डेकाटे आदी बैठकीला उपस्थित होते.
सदर कामाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात येणा-या समितीमध्ये अशासकीय सदस्याची सुध्दा नियुक्ती करावी व समितीमार्फत जलजीवन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करुन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून त्रुटी आढळलेल्या कामाची चौकशी करावी व तसा अहवाल सादर करावा अशा सुचना श्री. भोयर यांनी केल्या.
सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतील पाणी पुरवठ्याची कामे जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आली होती. . या कामातील बरेचशी कामे अद्याप पर्यंत पुर्ण झालेली नाही तसेच झालेल्या कामातील पाईपलाईन मध्ये त्रुट्या आढळून आल्या असून पाईन लिकीज असल्याचे सुध्दा आढळून आलेले असल्यामुळे गावातील नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पाईप लिकीज असल्यामुळे काही नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी माजी सरपंचांनी मंत्रीमहोदयांसमोर मांडल्या. त्यामुळे तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाणी पुरवठा विभागास केल्या.
ज्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे घेण्यात आलेली नाही त्या गावातील कामे पाणी टंचाई आराखड्यात घेण्यात यावी. गावातील प्रत्येक कुंटूबाला पाणी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे हे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रत्येक कुंटूब पिण्याच्या व वापराच्या पाण्यापासुन वंचित राहणार नाही याची दक्षत घ्यावी अशाही सुचना यावेळी पंकज भोयर यांनी दिल्यात.