प्रभारी पदाचा वनवास संपेना अन् हक्काच्या पदाला न्याय देता येईना ?
मूर्तिजापूर - सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आणि पवित्र स्थान म्हणजे " शाळा " होय अशातच मानवाला जिवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे म्हणतात मात्र याच विभागाला तालुक्यात अनेक वर्षापासून रिक्त पदाचे ग्रहण लागले असून शिकवणी सह शैक्षणिक कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलल्या जात आहे.
तालुक्यात प्राथमिक १३९ व माध्यमिक २ अश्या एकुण १४१ जिल्हा परिषदेच्या शाळा असून यामध्ये १४ केंद्र शाळा आहेत ६ हजार १६० इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, यांना शिकविण्यासाठी मुख्याध्यापकांसह ४०६ शिक्षक कार्यरत असून कार्यरत मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या दैनदिन शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पर्यवेक्षकांची भुमिका पार पाडणारे ३ केंद्रप्रमुख कार्यरत असून उर्वरीत ११ केंद्रप्रमुखांचा पदभार हा प्रभारींच्या भरोश्यावर सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या दैनंदिन शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नियंत्रक म्हणून तालुक्याच्या ठिकाणचे महत्वाचे अन् जबाबदार वर्ग २ च्या दर्जाचे पद गटशिक्षणाधिकारी यांच्यासह ३ विस्तार अधिकारी यांच्या पदाचा भार सहन करत एकटे प्रभारी गटशिक्षणाधिकारी असल्याने कारणाने शालेय दौरे, कार्यालयीन कामकाज, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे हे सर्व करत असताना तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदासह प्रभारी पदांचा वनवास संपणार केव्हा ? असा प्रश्न पडला असून प्रभारी पदाचा कारभार सांभाळताना हक्काच्या पदाला न्याय देता येत नसल्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. यावर शासनस्तरावरून काय उपाय योजना केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------------------------------------
अशी आहे रिक्त पदांची परिस्थीती
१) गटशिक्षणाधिकारी, वर्ग - २ - रिक्त १
२) विस्तार अधिकारी ( शिक्षण ) - रिक्त २
३) केंद्रप्रमुख मंजूर १४ , कार्यरत ३ - रिक्त ११
४) उच्चश्रेणी मुख्याध्यापक मंजूर ९, कार्यरत ५ - रिक्त ४
५) माध्यमिक शिक्षक मंजूर ९, कार्यरत ५ - रिक्त ४
६) शिक्षक मंजुर ४३५, कार्यरत ४०६ - रिक्त २९
७) गट समुह साधन केंद्र येथे - लेखा लिपीक - १ रिक्त
डेटा एन्ट्री ऑफरेटर - १ रिक्त
-----------------------------------------
संबंधीत विभागाकडून अहवाल घेऊन रिक्त पदांच्या बाबतीत पदनिहाय माहीती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.
अशोक बांगर, गटविकास अधिकारी
पंचायत समिती मूर्तिजापूर
----------------------------------------
दरमहा रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांकडे सादर केला जातो मात्र चार पदांचा कार्यभार सांभाळत असतांना मनुष्य बळांची कमी असल्याचे जाणवते प्रत्येक वेळी प्रत्यक्ष उपस्थिती आणि प्रत्येक कामाला न्याय मिळेल याची शाश्वती नसते.
संजय मोरे, प्र. गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, मूर्तिजापूर.