उलट्यांचा त्रास सुरु...!
जिल्हा प्रतिनिधी,पवन पाटणकर
अमरावती : अमरावती येथील नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या कामगारांना नेमकी अन्नातून की पाण्यातून विषबाधा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
गोल्डन कंपनीत विषबाधा...
आज दुपारी गोल्डन फायबर कंपनीतील सुमारे १०० पेक्षा अधिक कामगारांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. एकाचवेळी एवढ्या मोठ्या कामगारांना हा त्रास होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या कामगारांना अन्नातून विषबाधा झाली की कंपनीतील पाण्यातून विषबाधा झाली, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. विषबाधा झालेल्या कामगारांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
कामगारांवर उपचार सुरु...!
या कंपनीत एकाच वेळी १०० पेक्षा जास्त कामगारांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर त्या सर्व कामगारांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हालविण्यात आले. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहे. मात्र ही विषबाधा कशामुळे झाली, याचा तपास सुरु आहे. यापैकी बरेच रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागाचे पथक सर्व रुग्णांवर उपचार करत असून विषबाधा कशामुळे झाली या प्रकाराचा तपास सध्या सुरु असल्याचे सांगितले जात आहे.