किनवट, विशेष प्रतिनिधी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातून करीत आला आहे. परंतु, अलिकडे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण वाढू लागले आहे. त्यातच विभक्त कुटुंबद्ध कुटुंब पद्धती वाढत असल्याने बैल जोडी पाळणे एकलपायी शेतकऱ्यांना जिकरीचे होत आहे. बैल जोडी असल्यास नेहमी चारापाणी करण्यासाठी एक माणूस गुंतून असतो त्यामुळे शेतकऱ्यांना बैल जोडी न ठेवताच काही यांत्रिक मशीनने न होणारी कामे बैल जोडी मागामागी किंवा मजुरेंनी लावून शेतीची कामे करून घेत आहेत. त्यामुळे बैलजोडी पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.
त्यातच बैल खरेदीचा लाखाच्या घरात गेलेला आकडा आणि बैलांच्या संगोपनाचा खर्च हाताबाहेर गेल्याने टॅक्टरच्या माध्यमातून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे कृषी प्रधान देशात यांत्रिकीकरण वाढल्याने बैलजोडी मशागत कालबाह्य होऊ लागली आहे.
खरीप व रब्बी हंगामातील शेतीची मशागत व नांगरणी बैलजोडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते. पण सध्याच्या परिस्थितीत निसर्गाच्या अवकृपाने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. उत्पन्न कमी व खर्च जास्त येत असल्याने शेतकऱ्याला बैलजोडी, चारा, मजुरी यांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक भर आहे. तसेच शासनाकडूनही विविध सबसिडीच्या माध्यमातून ट्रॅक्टर व मशागत आणि पेरणीचे लहान- मोठे यंत्र उपलब्ध होत आहे. जवळपास १० एकर क्षेत्र असलेले शेतकरी बैल जोडी सह ट्रॅक्टर व यंत्राचा वापर करत असल्याने ठराविक शेतकऱ्यांकडेच बैलजोडी मिळत आहे. कमी वेळात शेतीची कामे होत असल्याने आता बैलजोड्या तुरळक प्रमाणात दिसत आहेत.
यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु महागाईमुळे यंत्रांच्या किमती वाढल्या. त्याला लागणारे डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यातच शेतीचा वाढता खर्च, अवकाळी पाऊस, शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले अनेक ठिकाणी बघावयास मिळत आहे.