वर्धा : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच राज्यातही लोकसभेच्या जागावाटपावरुन पक्षांमध्ये चढाओढ होत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना राजकीय पक्षांनी, आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.वर्धा लोकसभेच्या जागेवर गेल्या सहा महिन्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. महायुतीमधील घटक पक्ष देखील वर्ध्याच्या जागेवर हक्क सांगत आहेत. सध्या ही जागा भाजपकडे आहे. महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभा क्षेत्रात झालेली कामे ही भाजपने केली आहे.
त्यामुळे वर्धा लोकसभेची जागा महायुतीत भाजपचीच असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महायुती आज फोडणार प्रचाराचा नारळ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती कामाला लागली असून, आज राज्यभरात सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीचा मेळावा वर्ध्यात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वर्धा लोकसभेची जागा महायुतीत भाजपचीच
आज होणाऱ्या हा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रामदास तडस यांनी वर्धा लोकसभेची जागा महायुतीत भाजपचीच असल्याचा दावा केला आहे. 2014 आणि 2019 या नऊ-साडे नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये वर्धा लोकसभा क्षेत्रात झालेली कामे ही भाजपने केली आहे. त्यामुळे आपण तर ही जागा मागणारच आहोत. परंतु पक्षश्रेष्ठीचा निर्णय जो असेल, तो आम्हाला मान्य असेल. या मतदारसंघात जो कुठला उमेदवार असेल त्याला आम्ही पूर्ण बहुमताने निवडून आणू, असा विश्वास रामदास तडस यांनी बोलतांना व्यक्त केला.