कर्मयोगी संत गाडगेबाबा
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे . महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत , महात्मा , विचारवंत , महापुरुष होऊन गेले व याच मातीत अनेक वीर जन्माला आले आणि येथील समाजातील लोकांना हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे करण्याचे काम त्यांनी केले आहे . महाराष्ट्राला अनेक संत लाभलेले आहेत . त्यापैकीच एक महान संत म्हणजे संत गाडगेबाबा . ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष म्हणजेच संत गाडगेबाबा . संत गाडगेबाबा यांची ओळख संत , कीर्तनकार , समाजसुधारक अशी होती .
संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव येथे झाला . संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर होते . संत गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. संत गाडगेबाबा हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जातात . त्यांची राहणी साधी होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांची जास्त आवड होती . ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात भटकायचे . संत गाडगेबाबांचा 20 व्या शतकातील समाजसुधारणा आंदोलनांमध्ये मोठा सहभाग होता . संत गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा , रूढी , परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण संत गाडगेबाबा देत असत .
संत गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा , भोळ्या समजुती , अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला . संत गाडगेबाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले . लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे . "देवळात जाऊ नका , मूर्तिपूजा करू नका , सावकराकडून कर्ज काढू नका , अडाणी राहू नका , पोथी-पुराण , मंत्र-तंत्र , चमत्कारा सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." ही त्यांची शिकवण होती. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते . समाज कार्यासाठी मिळालेल्या देणगीतून त्यांनी अनाथ लोकांसाठी अनाथालय, धर्मशाळा, आश्रम, विद्यालय सुरू केले. दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांच्यासाठी देव होते . संत गाडगेबाबा त्यांच्या सेवेमध्येच जास्तीत जास्त वेळ रमत होते . संत गाडगे बाबांनी काही उपदेशात्मक विचार सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत .
*उपदेशात्मक विचार *
1 . श्रीमंत गरीब असा करू भेद नका .
2 . सावकाराकडून कर्ज घेऊ नका .
3 . देवा धर्माच्या नावा खाली प्राणी हत्या करू नका .
4 . व्यसनाच्या आहारी जाऊ नका .
5 . चोरी करू नका .
6 . जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका .
संत गाडगेबाबांनी दिनांक 11 फेब्रुवारी 1905 रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला . त्यांनी तीर्थाटन केले , अनेक ठिकाणी भ्रमण केले . वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही . कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे , मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे . ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे व समाजसेवा करायचे . संत गाडगेबाबा यांनी आपल्या जीवनात समाजसेवेचे व लोकप्रबोधनाचे व्रत हाती घेतले होते . अंगावर गोधडीवजा फाटके तुकडे कपडे आणि हातात एक फुटके गाडगे अशी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा होती . त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत असत . सार्वजनिक स्वच्छता , अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले . समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयष्य त्यांनी वेचले होते . संत गाडगेबाबा यांनी काही प्रेरणादायी विचार सांगितले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत .
*प्रेरणादायी विचार *
1 . जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो .
2 . शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे .
3 . दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका .
4 . शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते .
5 . दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही .
6 . धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका .
7 . माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप .
8 . माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे .
9 . दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा .
10 . अडाणी राहू नका , मुला-बाळांना शिकावा .
संत गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत असत . आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करायचे . ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे . संत व सुधारक या दोन्ही ही वृत्ती संत गाडगेबाबा यांच्यामध्ये होत्या . संत गाडगे बाबांच्या कीर्तनात संत तुकाराम महाराज आणि ज्योतिबांची शिकवण दिसत असे . संत गाडगे बाबा यांचा मृत्यू दिनांक 20 डिसेंबर 1956 रोजी झाला . ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’ असे सांगत दीन ,दुबळे , अनाथ , अपंगांची सेवा करणारे थोर संत गाडगेबाबा होते .
स्वच्छतेतून ग्रामविकासाचा मार्ग दाखविणारे थोर समाजसुधारक, ग्रामसुधारणेचे जनक संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीदिनी माझे कोटी कोटी वंदन व विनम्र अभिवादन .
शब्दांकन
नागन्नाथ घोरपडे
श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय .