विज्ञान प्रदर्शनातून बालवैज्ञानिकांच्या कल्पकतेला व्यासपीठ...!

 






तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात ; ९९ प्रतिकृतींचे सादरीकरण, निवडक प्रकल्पांची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड


Editor milind jamnik 


मूर्तिजापूर : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मूर्तिजापूर हायस्कूल येथे १३ व १४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडले. प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी विविध गटांतील विजेत्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.

        या प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रतिकृती सादर केल्या. एकूण ९९ प्रतिकृतींच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांनी आपली कल्पकता, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्याचे दर्शन घडविले. प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करत विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मूर्तिजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल देविकर यांनी भूषविले. गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके, मुख्याध्यापक प्रशांत भारती, विज्ञान विषय सहाय्यक मोनाली सौंदाडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष देवानंद मुसळे, सचिव रवींद्र जायले आणि कोषाध्यक्ष विलास कचले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक शेगोकार यांनी केले, तर गोपाल पाचडे यांनी प्रास्ताविक केले.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विज्ञान अध्यापक मंडळाचे अमित पोटे, आकाश कोल्हे, गोपीचंद गजभिये, गणेश घाटे, प्रमोद धोटे, प्रगती शिरभाते आणि कीर्ती ढोकणे यांच्यासह मूर्तिजापूर हायस्कूलचे पर्यवेक्षक बकाले , मंगेश शिवणकर, सचिन ताडे, चंद्रकांत राठोड, दिनेश खलेलकर, अमित सोळंके, शिक्षिका दहे आणि शिक्षिका किरण भास्कर यांनी परिश्रम घेतले.

---------------------------------------------------

*  प्राथमिक गटातील विजेते

प्राथमिक गटात जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, सोनोरी हिने प्रथम क्रमांक पटकावला. सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, मूर्तिजापूर द्वितीय, तर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, किनखेड हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके भाऊसाहेब बिडकर विद्यालय, अनभोरा आणि अष्टविनायक इंग्लिश स्कूल, सिरसो यांना देण्यात आली. दिव्यांग गटातून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिखलीच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आली.

---------------------------------------------------

*  माध्यमिक गटात व्यंकटेश बालाजी इंग्लिश हायस्कूल प्रथम

माध्यमिक गटात व्यंकटेश बालाजी इंग्लिश हायस्कूल, मूर्तिजापूरने प्रथम क्रमांक मिळविला. मूर्तिजापूर हायस्कूलने द्वितीय, तर सेंटर इंग्लिश स्कूल, मूर्तिजापूरने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिके जुबली इंग्लिश हायस्कूल आणि भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, मूर्तिजापूर यांना मिळाली. दिव्यांग गटातून सिद्धार्थ विद्यालय, मूर्तिजापूरच्या प्रतिकृतीची निवड झाली.

---------------------------------------------------

*  शिक्षक गटातील प्रतिकृतींचीही निवड

शिक्षक गटातील प्राथमिक विभागातून योगिता पुरी (जवाहर विद्यालय, जामठी) यांच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. माध्यमिक विभागातून राजीक अली मजहर अली यांच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रतिकृतींना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post