३२ चोऱ्या, १४ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस
२७ लाखांपैकी ७० टक्के मुद्देमाल हस्तगत
उपसंपादक संतोष भालेराव
परतवाडा: परतवाडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या ३२ आणि घरफोडीच्या १४ एकूण ४६ गुन्ह्यांचा छडा एका महिन्यात लावण्यात मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणांमध्ये सुमारे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी तब्बल ७० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध आणि संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे.
एकीकडे चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा होत असताना,
दुसरीकडे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या एका महिन्यात सायबर फसवणुकीची १३ नवीन प्रकरणे समोर आली असून, वर्षभरातील एकूण प्रकरणांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. या प्रकरणांमध्ये सुमारे ३३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी परतवाडा पोलिसांनी शहरातील
व्यापाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याचे, संशयास्पद संदेशांपासून दूर राहण्याचे आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन करण्यात आले.
परतवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न घालवता राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित संपर्क साधावा. तसेच आपली बँक खातेविषयक माहिती, ओटीपी, एटीएम कार्डचा तपशील किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. अनोळखी लिंक उघडणे टाळावे आणि संशयास्पद संदेश आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. परतवाडा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, गुन्हेगारी आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगितले आहे.
वाहतूक चलनाच्या नावाने बनावट संदेश
सध्या वाहतूक विभागाच्या नावाने काही लिंक किंवा मेसेज सोशल
मीडियावर प्रसारित होत आहेत. अशा संदेशांमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्यांची सत्यता तपासणे आवश्यक आहे. नागरिकांनी अधिकृत
शासकीय संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


