गावांमध्ये पार्सल पोहोचणार कसे ?
एसटीची पार्सल सेवा तीन महिन्यांपासून ठप्प; ग्रामीण नागरिक, व्यापारी अडचणीत
अमरावती : गावागावांना जोडणाऱ्या एसटी महामंडळाची स्वस्त आणि सुरक्षित पार्सल सेवा गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदार यांच्यातील करार रद्द झाल्यानंतर अद्याप नवीन कंत्राटदार नियुक्त झालेला नसल्याने ही सेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाने पार्सल सेवेचे कंत्राट एका खासगी एजन्सीला दिले होते. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत नागरिकांच्या अडचणी कायम राहण्याची शक्यता आहे.
पार्सल सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील छोटे व्यापारी व व्यावसायिकांना माल पाठविण्यासाठी खासगी कुरिअर, ट्रान्सपोर्ट किंवा स्वतःच्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला असून, माल वेळेत पोहोचविण्यातही अडचणी निर्माण होत आहेत.
शहरातून ग्रामीण भागातील मेडिकल स्टोअर्स, रुग्णालये आणि डॉक्टरांकडे औषधे तसेच वैद्यकीय साहित्य पाठविण्यासाठी एसटीच्या पार्सल सेवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात होता. मात्र, सेवा बंद असल्याने तातडीचे साहित्य पाठविण्यासाठी पर्यायी आणि महागड्या वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत आहे.
दुर्गम गावांमध्ये अडचण अधिक
खासगी कुरिअर कंपन्यांची सेवा प्रामुख्याने शहर आणि तालुका पातळीपर्यंत मर्यादित असल्याने दुर्गम गावांमध्ये पार्सल पोहोचविण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. एसटी बसस्थानकांवरील पार्सल बुकिंग आणि डिलिव्हरी काउंटरही बंद असल्याने ग्रामीण नागरिकांसमोर पार्सल पाठवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंत्राट रद्द झाल्याने बुकिंग काउंटरला टाळे
नवीन कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सेवा पुन्हा सुरू होण्यास किती कालावधी लागणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे नवीन व्यवस्था होईपर्यंत पर्यायी पद्धतीने पार्सल सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे.
