पोल्ट्री फार्ममधील ४०० कोंबडीची पिल्ले चोरी प्रकरण ; सायबर तंत्रज्ञान व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
मिलींद जामनिक- संपादक
मूर्तिजापूर : तालुक्यातील नागोली शेतशिवारातील पोल्ट्री फार्ममधून ४०० कोंबडीची पिल्ले चोरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दानीशखान फिरोज खान ऊर्फ राजा डॉन (वय २८, रा. पठाणपुरा, जुनी वस्ती, मूर्तिजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नागोली शेतशिवारातील अनुराग राजेंद्र बोरे (रा. गोयनका नगर, मूर्तिजापूर) यांच्या पोल्ट्री फार्ममधून ४०० कोंबडीची पिल्ले चोरीस गेल्याची तक्रार मिळाल्यानंतर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात अप. क्र. ३६६/२०२३, कलम ३८०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मेहमुद शहा मोहम्मद शहा (वय ३८, रा. पठाणपुरा) आणि दानीशखान फिरोज खान ऊर्फ राजा डॉन या दोघांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
यापैकी मेहमुद शहा यास पोलिसांनी यापूर्वीच अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. मात्र, दानीशखान हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरत होते.दरम्यान, पोलिसांनी सायबर तंत्रज्ञानाची मदत तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर पोलिस पथकाने पठाणपुरा, जुनी वस्ती येथे सापळा रचला. आरोपी घरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार दीपक महाडीक, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलीस हवालदार मनीष मालठाणे, राजेश डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल शंकर खेडकर व अंकित टोंगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
