वऱ्हाडी बोलीतून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे धडे...!

 

मूर्तिजापूर अकोला



रामगावकर तळेगाव दशासर


कवी राजेंद्र भटकर यांचे मुर्तिजापूर हायस्कूलमध्ये मार्गदर्शन ; मातृभाषेच्या जतनासह शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित



मुर्तिजापूर : वऱ्हाडी बोलीभाषेतील साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेचा अभिमान, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्यांची रुजवण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध वऱ्हाडी कवी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र समाधान भटकर यांनी मुर्तिजापूर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या मार्गदर्शनपर कार्यक्रमात त्यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीतून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.

     वऱ्हाडी बोलीभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीचे, परंपरेचे आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब आहे. या भाषेचा अभिमान बाळगतानाच तिचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारावी, असे आवाहन भटकर यांनी केले. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात प्रगती साधताना मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांना विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

आपल्या सहजसुंदर वऱ्हाडी भाषाशैलीतून त्यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद लक्षवेधी ठरला. साहित्याच्या माध्यमातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देतानाच समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वऱ्हाडी साहित्याची ओळख होण्यासोबतच मातृभाषा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विचार करण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविकर, पर्यवेक्षक दिनेश बकाले, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासक्रमाबरोबरच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांची जोड देणारे असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. अशा संवादातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, सर्जनशीलता आणि मातृभाषेविषयी आत्मीयता वाढण्यास निश्चितच हातभार लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post