रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नांदेड : किनवट तालुक्यात सुरू असलेल्या भरड धान्य खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे, तसेच सोयाबीनची नाफेडमार्फत होणारी हमीभावाने शासकीय खरेदी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील व निवृत्त पोलीस निरीक्षक गंगाधर राठोड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड यांची भेट घेऊन भरड धान्य खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची विनंती केली.
किनवट तालुक्यात भरड धान्य खरेदी सुरू करताना जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे शेवटच्या दाण्यापर्यंत धान्य खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, सोयाबीनचा हंगाम सुरू होत असून शेतकऱ्यांनी पीक काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाफेडमार्फत हमीभावाने होणारी सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे करण्यात आली.
शासकीय हमीभाव खरेदीला विलंब झाल्यास शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी दराने सोयाबीन विकावे लागते. त्यानंतर दलालांकडून हेच सोयाबीन शासनाला विकले जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि शासनाच्या निधीचाही अपव्यय होतो, अशी भूमिका संघटनेने मांडली.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा आणि हमीभाव खरेदीतील मध्यस्थांची साखळी थांबावी, यासाठी शासनाने सोयाबीन खरेदी वेळेत सुरू करावी, अशी मागणी रमेश कदम पाटील यांनी केली.


