प्रतिनिधी/ बाबुराव आगलावे
लातूर : जिल्हा परिषद कन्या प्रशाला, भादा (ता. औसा) येथे कार्यरत असलेले महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेंतर्गत शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली.
प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी "लातूर जिल्ह्यात इंस्पायर अवार्ड्स मानक योजनेमुळे विद्यार्थ्यांत विकसित होणारी संशोधनवृत्ती, सर्जनशीलता व सामाजिक उपयोगितेचा अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनास विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतर आयोजित मौखिक परीक्षेनंतर त्यांना पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.
या मौखिक परीक्षेचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी भूषविले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. (डॉ.) वैभव जाधव यांनी बाह्य परीक्षक म्हणून सहभाग घेतला. यावेळी शिक्षणशास्त्र संकुलाच्या संचालिका प्रा. वैजयंता पाटील, संशोधन मार्गदर्शक डॉ. गोपाळ पवार यांच्यासह अनेक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंस्पायर अवार्ड्स मानक योजनेवर आधारित हे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. या योजनेशी संबंधित पीएच.डी. स्तरावरील देशातील हे दुसरे संशोधन असल्याचे सांगितले जात आहे. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारी संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक उपयोगिता या तीन महत्त्वपूर्ण घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
डॉ. शिवलिंग नागापुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील मान्यवर, शिक्षण विभागातील अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
