राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने आग्रा येथे ५ दिवसीय धम्मसेवक संघ प्रशिक्षण शिबिर
मराठवाडा संपादक- अनिल बंगाळे
किनवट : राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मसेवक संघाचे पाच दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर दि. ४ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद भालेराव बौद्ध यांनी २० जून २०२६ रोजी ही माहिती दिली. सशक्त, अनुशासित आणि युवकांना प्रभावी नेतृत्वासाठी तयार करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यालय, गौतम बुद्ध इंटर कॉलेज, नगला माकरोल, ग्वालियर रोड, रोहता, आग्रा येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार धर्मप्रकाश भारतीय बौद्ध व राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून राष्ट्रीय आचार्य इंजिनिअर किशोर बौद्ध हे धम्मसेवकांना प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात देशभरातील विविध राज्यांमधून निवड करण्यात आलेले कमांडर व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान संघटन विस्तार, धम्म प्रचार-प्रसार, प्रभावी नेतृत्व विकास तसेच निस्वार्थ भावनेने कार्य करणारे समर्पित कार्यकर्ते (कॅडर) घडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. बहुजन मिशनला अधिक गती देण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
डॉ. आनंद भालेराव बौद्ध यांनी राष्ट्रीय, प्रदेश, महिला पदाधिकारी, ट्रस्ट परिषदेचे सर्व सभासद तसेच सहभागी होणाऱ्या सर्व प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहून प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

