प्रतिनिधी | श्रीकांत राऊत, यवतमाळ
Yavatmalnews,महागाव : यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्रे व अवैध उद्योगांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुंज येथे सुरू असलेल्या 52 पत्ता जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ₹55 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दिनांक 13 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मौजे गुंज येथील श्रीधर पुंजाराव जोरोळे यांच्या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैशांच्या हारजितीवर 52 पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगार साहित्य तसेच मोबाईल फोन असा एकूण ₹55,960 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महागाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

