मुंबईत जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक; धामणगाव मतदारसंघातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा

 


जिल्हा प्रतिनिधी : निलेश रामगावकर

मुंबई येथे आज जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धामणगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.



बैठकीदरम्यान सोनगाव शिवनी प्रकल्प, रायगड नदी प्रकल्प तसेच चांदी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देणे आणि धमक पुनर्वसनासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

त्यानंतर बेंबळा प्रकल्पांतर्गत चांदूर रेल्वे तालुक्यात स्मार्ट व्हिलेज योजनेअंतर्गत मंजूर आठ गावांतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. गावांतील अपूर्ण नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये गावांतर्गत डांबरी रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकाम, अपूर्ण नाल्यांची कामे, समाजमंदिरांची अपूर्ण कामे पूर्ण करणे, पाणीपुरवठा विहिरींवर सोलर पंप बसविणे तसेच विहिरींकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती यांचा समावेश होता.


याशिवाय घुईखेडसह इतर गावांच्या विकासकामांशी संबंधित प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देणे आणि ₹१०,००० अनुदानाचे धनादेश तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले डांबरी रस्ते सध्या अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरजही बैठकीत अधोरेखित करण्यात आली.


तसेच चांदूर रेल्वे शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण, श्री दुर्गा माता मंदिर ते संत श्री बेंडोजी बाबा मंदिर या सुमारे दोन किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण व सौंदर्यीकरण आणि या संपूर्ण मार्गावर सोलर स्ट्रीट लाईट उभारण्याची मागणीही करण्यात आली.


बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांची मंत्री गिरीश महाजन यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विषयांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.









Post a Comment

Previous Post Next Post